Tuesday, September 25, 2007

युवा आणि मी (Yuva and I)

Posted by: शशि (Shashi)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)


माझ्या माहितीप्रमाणे युवाने बंगलोर महाराष्ट्र मंडळाच्या विश्वात “युवा” हे अभिधान मिरवत टाकलेलं पहिलं पाउल होतं गणेशोत्सवात सादर केलेली नाटिका “दरवेशी” (१९९५). सुरुवात अशी नाटकानेच झालेली असली तरी तेव्हा युवा म्हणजे नाटक असं समीकरण रुढ झालेलं नव्हतं. तसा विचारच नव्हता. समवयस्क मुलामुलींशी ओळख व्हावी, एकत्र जमावं, (मराठीत) गप्पा झोडाव्या, कधी ट्रिप काढावी, गणपतीत गंमत म्हणून नाटक बसवावं, मंडळाच्या हॉलची सजावट करावी, महाप्रसादाच्या जेवणात पंगती वाढाव्या, वर्षातून एकदा युवा डे (हल्लीच्या “जल्लोष”च्या धर्तीवर) साजरा करावा, कोजागिरी/ ३१ डिसेंबरच्या रात्री कोणाच्यातरी घरी (बहुतेकदा हर्षा-राजीच्या किंवा कीर्ती-प्रीतीच्या!) गच्चीवर गिल्ला करावा, एकमेकांना भरपूर चिडवावं, खावं-प्यावं, कल्ला करावा अशा काही माफक अपेक्षा होत्या आणि त्या नेमाने पूर्ण होत होत्या. युवात सामील व्हायचे निकष होते फक्त तीन – (१) तुमचे वय १६ ते २४ असले पाहिजे, (२) तुम्ही अविवाहित असला पाहिजेत, आणि (३) तुम्हाला मराठीचे थोडेतरी ज्ञान असणे आवश्यक.

आता मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं युवातले ते पहिले दिवस ब-याच अंशी कॉलेजजीवनासारखे तुफान होते. तोच उत्साह, तीच तरुणाई, तेच शिकणे, तशीच गंमत, तसाच टाईमपास, तसेच झोकून देणे आणि हुंदडणे! युवा माझे दुसरे कॉलेजच होते म्हणा ना. किंबहुना ख-या कॉलेजहून जास्त जिव्हाळ्याचे.

दिवस असे मजेत जात होते. ९७च्या गणेशोत्सवात युवाने एक नवीन प्रकार केला. “युवा उवाच” नावाचे एक मासिक सुरु केले. त्यातली पहिली कविता होती अशी –

राजमान्य राजेश्री, पत्र लिहिण्यास कारण की
आम्ही दिव्य पोरं पोरी, आमचं युवा लई भारी
करीत असतो नाटकं फार, अभ्यास-कामाची मारामार
नमुने एकेक फारच भारी, लाज नाही घरीदारी
दिसायला चेहरा फारच भोळा, प्रत्येकाच्या अंगी नाना कळा
अशा आमच्या युवाचे, कार्यक्रम मोठ्या मोलाचे
तरी तुम्ही यावे, युवात सामील व्हावे
युवामध्ये स्वागत तुमचे, धन्य आहोत आम्ही आमचे

कुठल्या कवीची ही प्रतिभा होती आता कळायला मार्ग नाही. राहुल काशीकर, प्रफुल्ल इंगळे, सचिन देसाई हे त्रिकूट तेव्हा फॉर्मात होतं. त्यांच्यापैकीच जो कोणीतरी असेल तो असेल, पण त्याने मला प्रेरणा द्यायचं काम केलं होतं.

दहा वर्षांपूर्वी जगात मोकळा वेळ ही मौल्यवान चीज मुबलक मिळायची. म्हणजे निदान ती आत्तासारखी खोल खाणीतून खणून काढावी लागत नसे. खिशात दमडा नसतानाही साहित्य-संगीत-कलांसारख्या सोन्याहून पिवळ्या गोष्टींसाठी वेळ खर्च करणे मात्र तेव्हा परवडत होते. त्यातून कमावलेल्या आनंदाची खरी किंमत आत्ता लक्षात येऊ लागलीय.

तर “युवा उवाच” मासिक चालवायची जबाबदारी मोठ्या उत्साहाने मी आपल्या शिरावर घेतली. मात्र मासिकाला नियमितपणे पाजता येईल इतक्या प्रमाणावर युवातल्या कोणाचीच प्रतिभा वाहत नसल्याचे लक्षात आल्यावर मासिकाचे लवकरच अनियतकालिक करण्यात आले. सुरुवातीला एक-दोन अंक भूपेश देशमुख आणि केदार देवधर माझ्या मदतीला होते. कधीतरी नयनच्या घरी मी तिच्या कंप्यूटरवर तिच्याचकडून मराठी टाईप करून घेतल्याचे आठवतेय.

युवा उवाचला खरा बहर आला तो २००० मध्ये अमोल थेरे आणि अभय घैसास मला येऊन मिळाले तेव्हा. त्या एका वर्षी आम्ही विक्रमी दोन अंक काढले होते. एक जानेवारीत आणि दुसरा गणेशोत्सवात. दोन्ही अंक १२ पानी म्हणजे आमच्या लेखी चांगलेच भरगच्च होते. आणि मजकूर तरी काय ग्रेट! य़ुवानेच केलेल्या नाटकाचे विडंबन, सहल वर्णने, कॉमिक स्ट्रिप्स, कविता, विनोद, युवाच्या तोपर्यंतच्या नाट्यप्रवासाचे सिंहावलोकन, पुलंच्या निधनावर माझा श्रद्धांजलीवजा अग्रलेख, राजूच्या अफलातून डिजिटल कौशल्याची पहिली चुणूक दाखवणारा माझा आणि अमोलचा लारा दत्ताबरोबरचा फोटो, मंडळातल्या बुजुर्ग उदासकाकांचा “आम्हीही तरुण होतो” हा ते ‘युवा’ असतानाच्या दिवसांवरचा लेख, मयुर जैनचा “अमेरिका अमेरिका” लेख, अभयने लिहीलेलं महादजी शिंद्यांचं व्यक्तिचित्र, सुजयची युवावरची मराठीतली कविता, आता इंटरनेटच्या माध्यमातून अक्षरश: जगभर पोचलेला आणि प्रचंड लोकप्रिय झालेला अमित सुलाखेचा “गाय” हा बालीश निबंध, “लग्न हो/ नाही? कधी? कसे?” ह्या विषयावर युवात घेतलेला सर्व्हे, राजूने युवाच्या तत्कालीन मेंबरांची काढलेली व्यंगचित्रे…किती सांगू आणि किती नको…यादी इतक्यात संपणार नाही! आता अभिमान वाटावा असे ते युवाचे वैविध्य, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा आणि डोकेबाज सृजनशीलता! “युवा उवाच”चे ते सुवर्णयुग होते.

मंडळाच्या रंगमंचावर धो धो यश मिळवायची सवयही तेव्हाच लागायला सुरुवात झाली होती. ९८ साली फेब्रुवारीत युवाने प्रथमच तिकीट लावून मंडळात “प्रेमाच्या गावा जावे”चे दोन हाउसफुल्ल प्रयोग केले आणि त्याच वर्षी गणेशोत्सवात “एक झंकार जपताना”ने बक्षिस समारंभात पहिल्यांदा झाडू मारला. ९९च्या गणेशोत्सवात “झोपी गेलेला…”ला सुद्धा चांगले यश मिळाले होते. २००० मध्ये “सदु आणि दादु”ने तर कळसच केला. पुलंच्या त्या नाटकात डबल रोल करताना आणि अभिनयाचे पहिले बक्षिस पटकावताना मला जे समाधान मिळालेय तसे पुन्हा अजून मिळायचेय. त्या एकांकिकेला आणि त्या युवा टीमला माझ्या मनात एक खास जागा आहे याचं कारण प्रत्यक्ष दिलीप प्रभावळकर (जे त्या दिवशी प्रेक्षकांत बसले होते) नाटिकेनंतर ग्रीन रूममध्ये येऊन पाठीवर कौतुकाची थाप मारून गेले. आणखी काय मोठे बक्षिस पाहिजे? माझ्यासाठी आयुष्यातल्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणांपैकी तो एक आहे एवढे नक्की.

ही सर्व घोडदौड चालू असताना युवात बेरीज वजाबाक्या चालू होत्याच. काही जण बंगलोर सोडून जात होते. त्यांना निरोप देताना छाती जडावत होती. काही नवीन लोक येत होते. त्यांचं स्वागत करताना, त्यांचा हरहुन्नरीपणा पाहताना नव्या हुरुपाने छाती पुन्हा फुगत होती.

आमच्यातले काहीजणांनी आता चोविशी ओलांडली होती, काही चतुर्भुज होऊ घातले होते. युवाच्या सहाव्या वाढदिवसाच्या आतच युवाचे पहिले दोन नियम धाब्यावर बसवण्याची वेळ आली. पण माझ्या मते अशा प्रकारे नियम शिथील करायला लागणे हेच युवाच्या यशाचे सर्वोत्तम द्योतक होते.

(क्रमश:)

4 comments:

Nikhil said...

Shashi ... Lai Bharii ... baryach goshti mahit navthya mala ... I think Yuva Blog is a good medium to know everything what has happened in YUVA.

Anonymous said...

he hi all of U it is nice to see yoour blog on blogadda. nad see because of blogadda only I got your latest post . it's nice to read about your yuva group .keep on writting and keep on guessing who I am .But I am your well wisher only.
best luck.

kaps said...

Good one Shashi !
Nice to read almost 10 years yuva's history.

I was witness of 1999-2002.
and one of the early one being barred from Yuva egroup because of the "marriage rule" !

There were some doubts how do we move on, or how do we market yuva, When people like Amit Sulakhe, Bhooshan, left Bangalore.
But the amazing power of YUVA kept attracting new talents and its continuing strongly.

wah wah punha vah yuva !

Unknown said...

Shashi, Khup chan watle vachun..
MI suddha 8-10 varsha mage javun aalo vachata vachata. Ya Yuva cha 2varsha mi pan ek zopalu karyakarta rahilo yacha mala abhiman aahe..:)
Baki Amit ne mazyakadun karavun ghetaleli Pawri chi bhumiketil dialog mi ajunhi waparto,
"maza don bi dola pandhra zala..!"

Milind Kulkarni (MiKu)