Tuesday, January 22, 2008

अंतरीची रत्ने

Posted by: देवेंन्द्र (Devendra)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)

'शब्द होते सजविले मी, सूर होते जुळविले
गीत होते गायचे पण काव्य होते हरविले'
चार-पाच वर्षांपूर्वी कपिलच्या बाबांकडून हे गाणे आम्ही ऐकले. बंगलोरमधील आम्हा हौशी कलाकारांचा - युवा संगीत प्रेमींचा - घोळका जयनगरला कपिलकडे जमला होता. तोपर्यंत कपिलचे बाबा गाण्यातले जाणकार आहेत, स्वतः छान गातात, पेटी वाजवतात इतपत आम्हाला माहिती होते, पण त्यांनी इतक्या छान कविता करून त्यांना चाली सजवल्या आहेत हे नव्यानेच कळत होते.

हल्लीच्या मराठी गाण्यांतून (काही सन्माननीय अपवाद वगळता) काव्य हरवले आहे याची खंत ज्यांना वाटते आणि जुन्याच्या छायेत वाढूनही नव्याचे कौतुक असणा-यांपैकी ते एक. तीच-तीच जुनी गाणी दळत बसण्यापेक्षा आपण काहीतरी दर्जेदार निर्मिती करावी, निवडक आठ-दहा गाण्यांचे रेकॉर्डिंग करुन एक कॅसेट काढावी हा त्यांचा संकल्पही तेव्हा त्यांनी बोलून दाखवला.

हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न आधीच सुरु केले होते. मराठी भावगीते लोकप्रिय करण्याचा श्रीगणेशा ज्यांनी केला ते गजाननराव वाटवे काकांच्या कवितांवर प्रसन्न झाले आणि काही कवितांना त्यांच्या खास मधुर शैलीत चालीदेखील लावल्या. त्यातल्याच एका गाण्याने हृषिकेश रानडेच्या आवाजात सत्यजित केळकरच्या पेरुगेटाजवळच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगचा श्रीगणेशा झाला. हृषिकेश तेव्हा आजच्या इतका यशस्वी व्हायचा होता पण काकांनी त्याच्यातील गूण अचूक हेरला होता. त्यानंतर एकेक करत गाणी तयार होऊ लागली आणि विचारपूर्वक वेगवेगळ्या गायकांकडून ती गाऊन घ्यायचे काम सुरु झाले. 'भावगंध' हा युवाने बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात सादर केलेला कार्यक्रम ऐकून अश्विनी गोरे या 'युवा' गायिकेचीही काकांनी निवड केली. त्यांच्या बंगलोर मुक्कामात तिच्याकडून गाणी बसवून घेणे सुरू झाले.

विजय रायकरांचे गायकांकडून चाली बसवून घेणे हा गायकांसाठी नसला (!) तरी माझ्यासारख्या श्रोत्यासाठी एक आनंददायक अनुभव होता. पेटीवर साथ करत, एकेक जागा मनासारखी येईपर्यंत घोटवून घेणा-‍या काकांवर सुधीर फडके, गजाननराव वाटवे अशा दिग्गजांचे उत्तम संस्कार होते याची प्रचीती मला आली. या गाण्यांच्या चालीसुद्धा अभिजात भावसंगीताच्या थाटाच्या आहेत. भावसंगीत म्हणजे ज्यात गीतकाराचे शब्द, संगीतकाराची चाल, गायकाचा आवाज, उच्चार, वाद्यांची साथ, ताल, लय, स्वरन् स्वर भावनिर्मितीसाठी प्रामाणिकपणे झटत असतात! 'सखया डोळ्यांत तुझ्या' मधील सुंदर प्रेमभावना असो किंवा 'सांभाळुनी हिला घ्या' मधील दुःखाचे अश्रू लपवित आपल्या मुलीची पाठवणी करणा-या आईची आर्तता असो, भावसंगीतावरील निष्ठा त्यांनी प्रामाणिकपणे जपली आहे याची सतत जाणीव होते.

कंप्युटरने रेकॉर्डिंगच्या जगात केवढी मोठी क्रांती घडवली आहे याचा अंदाज सत्यजितच्या स्टुडियोत आला. तालाच्या एका साध्या ट्रॅकच्या आधारे रेकॉर्डिंग सुरु झाले, मग त्यात त्याने हळुहळू वाद्यांचे रंग भरले. पूर्वी अखंड गाणे एकदम रेकॉर्ड करीत असत. आता एकेक ओळ, लागल्यास त्यातला एखादा शब्द पुन्हा अधिक चांगला रेकॉर्ड करणे अशी प्रक्रिया असते. सलग गाणे म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे हे जास्त कठीण आहे. हल्लीच्या सॉफ्टवेअरमध्ये स्वर कमी-जास्त झालेत का हेही तपासण्याची सोय असते. अश्या प्रकारे तालासुरात, उच्चारात सर्व प्रकारात एखादी ओळ उत्तीर्ण झाली की मगच पुढची ओळ! थोडक्यात म्हणजे भावनेला 'शास्त्रकाट्याची कसोटी' येऊ दे ही मर्ढेकरांची मागणी पूर्ण करणे! अश्या कठोर कसोटीला उतरलेल्या नऊ गाण्यांच्या या सीडीला 'अंतरीची रत्ने' असे समर्पक नाव लाभले आहे.

या रेकॉर्डिंगची आर्थिक बाजू आतापर्यंत काकांनीच सांभाळली होती. विशेष म्हणजे यातील एकाही कलाकाराने पैशासाठी काम केले नाही. श्रीधर फडकेंसारख्या नामवंताने मुंबईहून दोनदोनदा पुण्याला येऊन काकांना पसंत पडेपर्यंत रीटेक दिले, ते केले ख-‍या आनंदासाठी, काकांवरील प्रेमापोटी आणि त्यांच्या संगीतनिष्ठेवरील विश्वासासाठी. काकांनी स्वतःच्या पदरचे पैसे घालून केलेल्या या कामाची योग्यता पटल्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्र मदतीला धावून आली. स्वरानंद प्रतिष्ठानने प्रकाशन सोहळ्याची जवाबदारी उचलली. ज्येष्ठ कवी श्री. गंगाधर महांबरे यांच्या हस्ते आणि व्हायलिनमधून 'गाणारे' श्री. प्रभाकर जोग यांच्या उपस्थितीत 'अंतरीच्या रत्नां'चे प्रकाशन झाले.

सुगम संगीत रसिकांपर्यंत पोहोचावे म्हणून कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता, केवळ 'निर्मितीमूल्यात' ही सीडी 'वितरीत' करणे आता चालू आहे.

या अंतरीच्या रत्नांना रसिकांच्या ह्रुदयाचे कोंदण मिळावे हीच शुभेच्छा!


** खास बंगलोरच्या रसिकांसाठी ही सीडी दि.२५, २६ व २७ जानेवारी ला महाराष्ट्र मंडळात रंगदक्षिणी एकांकिका स्पर्धांच्या वेळी उपलब्ध असणार आहे.