Posted by: कपिल (Kapil)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)
‘ नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकम् समाराधनम्’…बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रेक्षागृहात बसल्यावर समोरच लिहिलेलं हे वाक्य नेहमी दृष्टीस पडतं..एक प्रेक्षक म्हणून ह्याची प्रचिती अनेकदा आली होती; पण एक (हौशी) कलाकार म्हणून मला याची प्रचिती आली ती 'युवा' मध्ये आल्यावर. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, लेखन, अभिनय, भटकंती, क्रिकेट अशा भिन्न विभिन्न (आणि चित्र-विचित्र) आवडी असलेल्या व केवळ 'प्रेक्षकाची' भूमिका न निभावता वेळात वेळ काढून हे सर्व छंद ख-या अर्थाने जोपासणा-या हरहुन्नरी तरूणांच्या या 'संघात' आल्यावर..
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)
‘ नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकम् समाराधनम्’…बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रेक्षागृहात बसल्यावर समोरच लिहिलेलं हे वाक्य नेहमी दृष्टीस पडतं..एक प्रेक्षक म्हणून ह्याची प्रचिती अनेकदा आली होती; पण एक (हौशी) कलाकार म्हणून मला याची प्रचिती आली ती 'युवा' मध्ये आल्यावर. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, लेखन, अभिनय, भटकंती, क्रिकेट अशा भिन्न विभिन्न (आणि चित्र-विचित्र) आवडी असलेल्या व केवळ 'प्रेक्षकाची' भूमिका न निभावता वेळात वेळ काढून हे सर्व छंद ख-या अर्थाने जोपासणा-या हरहुन्नरी तरूणांच्या या 'संघात' आल्यावर..
इतर वेळेस सर्व युवा आपापल्या आवडीनुसार ठराविक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. पण युवाचं गणेशोत्सवातलं नाटक ही एक अशी गोष्ट होती ज्यात सर्व 'युवा' उत्साहाने सामील व्हायचे. on-stage, backstage, प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य...जमेल त्या भूमिकेत प्रत्येक जण मनापासून काम करायचा. वगवेगळ्या आवडी असलेल्या अनेक 'युवां' साठी नाटक हे एक समान आनंदनिधान असल्याचं अशा वेळेस जाणवायचं.
व्यावसायिक सोडाच पण खरं तर हौशी कलाकार म्हणवण्या इतपत ही माझा या क्षेत्रातला अनुभव नाही. तरीही एकाच नाटकाच्या अनुभवाच्या भांडवलावर (‘माझा पहिला नाट्यानुभव’ छापाचा) नाटकावरचा हा लेख लिहायला मी सुरुवात केली आहे..पाठिशी (किंवा गाठिशी) अनेक नाटकांचा अनुभव असल्याच्या ऐटीत. [पुणेकराला 'मत ठोकून द्यायला' इतका अनुभव पुरतो :) ]
शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात मी कधीच नाटकात काम केलं नव्हतं व त्या नंतरही कधी करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं; पण युवामध्ये आल्यापासून अशा अनेक ‘कधी करेन असं वाटलं नव्ह्तं’ या सदरातल्या गोष्टी मी केल्या (गैरसमज नसावेत, केवळ सांस्कृतिक गोष्टींबद्दल बोलतोय..अजून एक उदाहरण म्हणजे स्टेज वर (एकदाच...किंवा 'एकदाचं' ) केलेलं नृत्य…अजूनही समोरच्या प्रेक्षकांचे (खोखो) हसणारे चेहरे आठवतायत..त्यावर लिहायचं म्हटलं तर तो एक स्वतंत्र लेख होईल. :-)
असो (किंवा नसो!)
असो (किंवा नसो!)
तर २००३ सालच्या गणेशोत्सवात मला य़ुवा च्या एका नाटकात एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. नाटकाचं नाव होतं ' जिवंत'. युवातल्याच आमच्या एका मित्रानी – देवेन्द्र देशपांडेनी हे नाटक लिहिलं होतं.
महाभारतातील 'अश्वत्थामा' हे पात्र केन्द्रस्थानी ठेवून ही कथा लिहिण्यात आली होती. अश्वत्थाम्यास त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांनुसार काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्याच्या प्रतिक्रिया कशा असू शकतील हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
"जिवंत" मध्ये माझी भूमिका एका चोराची होती. हा चोर कुणी बदमाश/अट्टल चोर नव्हता. घरात पोराला पाजायला दूध नाही म्हणून गावातून गाय चोरणारा एक (पैशानी व स्वभावानी) अत्यंत गरीब असा चोर होता. चोरी करताना पकडला गेल्यामुळे गावच्या पाटलाकडून थेट कडेलोटाची शिक्षा सुनावण्यात आलेला हा मी चोर. कडेलोटासाठी एका कड्यावर मला आणलं जातं. मी पाटलाचे पाय धरून दयेची, माफिची याचना करत असतो. पण त्याचा त्याच्यावर काहीएक परिणाम होत नाही. जवळच उभ्या असलेल्या 'म्हातारबाबाचे' (अश्वत्थाम्याचे) पाय धरुन मी त्याला मला वाचविण्याची विनंती करतो. शिक्षेची अंमलबजावणी होणार इतक्यात अश्वत्थामा हस्तक्षेप करुन कडेलोट ही शिक्षा योग्य नसल्याचे सर्वाना पटवून देतो व ह्या अपराधाला दुसरी एक योग्य शिक्षा सुचवून माझी म्रुत्यूच्या दाढेतून सुटका करतो. असा तो (करूण) प्रसंग होता.
रंगभूमीवरचा आयुष्यातला माझा पहिला प्रवेश हा असा चोरपावलांनी झाला.
दोन - तीन अनुभवी कलाकार सोडल्यास उरलेले सहा लोक अभिनयाची अगदीच 'तोंड'ओळखही नसलेले होते. अशा लोकांना घेऊन नाटक बसविण्याचे आव्हान देवेन्द्र व सुजयसमोर होतं. नाटकाचा विषय, त्याची संहिता, माझी भूमिका, संवाद, अभिनय या सर्व गोष्टींआधी एक सर्वात महत्वाची गोष्ट शिकणं गरजेचं होतं. विशेषत: नाटकात प्रथमच काम करत असल्याच्या पार्श्वभूमीवर. ती म्हणजे निर्लज्जपणा ( ''निर्भीडपणा' लिहिणार होतो पण 'निर्लज्जपणा' हाच शब्द जास्त योग्य वाटतो :-)). English मध्ये ज्याला conscious होणं म्हणतात ते अजिबात न होणं. मी जे करतोय ते मला जमतय का किंवा शोभतय का ? लोक काय म्हणत असतील ? असले विचार मनात येऊ लागले की ती भूमिका फसलीच म्हणून समजावं. या गोष्टीमुळे बरेचदा भूमिकेतला सहजपणा जायचा व 'अभिनया' ची जागा 'नाटकीपणा' घ्यायचा. प्रत्येकाच्या स्वभावानुसार या गोष्टींवर कमी जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागली.
तालमीची सुरुवात संहितावाचना पासून झाली. पक्कं पाठांतर व योग्य, स्पष्ट शब्दोच्चारांवर आधी मेहनत घेऊन मगच stage वर जावं असं ठरलं व भूमिका छोटी असल्यामुळे ते सहज शक्यही होतं. सुरुवातीला स्टेज वगैरे सगळं विसरुन केवळ बसल्या जागेवरच आपले संवाद वाचायचो. ते जास्तीत जास्त परिणामकारक कसे होतील हे बघायचो. थोडक्यात कायिक अभिनयाची मदत न घेता केवळ ‘वाच्’इक् अभिनयानी आपण तो प्रसंग कितपत उभा करू शकतो ह्याचा अंदाज घेतला. आवाजाची तीव्रता, पट्टी, आवाजातले चढ उतार अशा ब-याच गोष्टींचे प्रयोग करुन पाहिले. आपली भूमिका पूर्णपणे समजून घेतली. 'चोरा'चे पूर्ण व्यक्तिमत्त्व व कुठल्या प्रसंगात तो कसा बोलतोय/बोलू शकतो हे डोक्यात ठेऊन माझे संवाद पुन्हा पुन्हा वाचले. असं वाचता वाचता त्या flow मध्ये मला स्वतःलाच त्या संहितेतल्या माझ्या संवादात काही नवीन शब्द, वाक्यं सुचत गेली. यातले काही किरकोळ बदल तत्काळ स्विकारलेही गेले. ( हे नाट्यशास्त्राच्या नियमांना वगैरे कितपत धरून होतं हे ‘देव’ जाणे. कदाचित 'बालादपी सुभाषितम् ग्राह्यम्' हया द्रुष्टिकोनातून देवेन्द्रनी ते स्विकारले असतील).
ह्या नंतर प्रत्यक्ष स्टेज वर practice सुरू केली. आवाजाच्या तयारीचा एक भाग म्हणून रोज practice च्या आधी सगळे मिळून मन्द्र, मध्य व तार सप्तकात ॐकार लावायचो. यामुळे मन खूप शांत आणि एकाग्र व्हायचं. स्टेज वरच्या एन्ट्री पासुन एक्झिट पर्यन्त अनेक नवीन गोष्टी शिकायच्या होत्या. प्रेक्षाग्रुहाकडे बघून नाटकातले संवाद म्हणताना प्रत्यक्ष प्रेक्षकांकडे न बघता साधारणपणे शेवटच्या रांगेच्या थोडी वर नजर ठेवून म्हणणे, (स्वतःच्या व प्रेक्षकांच्या दृष्टीतून) stage वरच्या व्यक्तींमधल्या अंतराचा अंदाज घेऊन त्यानुसार सर्व हालचाली करणे, stage वर असताना कमीत कमी वेळा प्रेक्षकांकडे पाठ करणे, ऐन वेळी कुणी एखाद्या संवादात गडबड केली तर त्याला (आणि त्या प्रसंगाला) सांभाळून घेणे, exit घेताना विंगेत परतल्यावर लगेच भूमिकेतून बाहेर न येणे असे अनेक बारकावे शिकून ते आत्मसात करायचा प्रयत्न करत होतो.
माझ्या भूमीकेत संवाद फार नव्हते पण शारीरिक हालचाली खूप होत्या. कडेलोटाची शिक्षा झाल्यामुळे भीतीने शरीराला कंप सुटलेला, स्टेज वर प्रवेश झाल्यापासुनच पडत, धडपडत, मार खात, ओरडत दयेची याचना करणारा चोर मला दाखवायचा होता. हे सर्व प्रकार केल्यामुळे आणि विशेषतः शरीर सतत थरथरतं ठेवावं लागत असल्यामुळे ब-यापैकी दमायला व्हायचं. मला मारत कड्यावर आणलं जातय असं दाखवायचं होतं. माझी एन्ट्री जास्त natural वाटावी म्हणून मला विंगेतून स्टेज वर चक्कं ढकलून देण्यात यायचं. मी देखील running race मध्ये start घ्यावी तसा विंगेतुन start घेऊन पळत यायचो व स्टेज वर स्वतःला 'झोकून द्यायचो'.
अजित, अरविंदनी हणम्या व सुभान्या या पाटलाच्या अंगरक्षकांच्या (किंवा गुंडांच्या -:)) भूमिकेत आपापले हात (आणि पायही) माझ्यासारख्या गरीब चोरावर चांगलेच साफ करून घेतले. (एकदा भूमिकेत शिरले की अभिनय व वास्तव यातला फरक ते बहुधा विसरत असावेत. माझी अवस्था इसापनीतीतल्या त्या सशांसारखी व्हायची ' तुमचा (नाटकाचा) खेळ होतो पण माझा जीव जातो').
काही दिवसांनी पुरेशा तालमीं नंतर stage वरील कलाकारांचे सर्व प्रसंग ब-यापैकी बसले. नंतर music सह practice करु लागलो..युवा मधलं 'संगीत युगुल' देवेन्द्र व अश्विनी यांनी प्रत्येक प्रसंगाला अत्यंत समर्पक व परिणामकारक पार्श्वसंगीत दिलं होतं. काही ध्वनीफिती त्यांनी स्वत: मंडळात ध्वनीमुद्रित केल्या होत्या.
जसे जसे एक एक प्रसंग बसत गेले तशी तशी अनघा व अदिती ह्यांची लाईट्सची टीम ही ‘उजेड पाडू’ लागली.
‘आपली भूमिका हास्यास्पद होऊ नये’ इतकी माफक 'महत्त्वाकांक्षा' घेऊन उजाडलेला तालमीचा पहिला दिवस आणि ‘आपल्या नाटकाला बक्षिस मिळणारच’ हा आत्मविश्वास देऊन जाणारा रंगीत तालमीचा शेवटचा दिवस या 'दोन' दिवसां मध्ये दिग्दर्शका प्रमाणेच सर्व on stage व back stage कलाकार, music team, lights team, team ह्या सर्वांनी घेतलेले अपार कष्ट होते.
नाटक झाल्यावर अनेक लोकानी मला नाटक व माझी भूमिका चांगली झाल्याचं सांगितलं. मला तरी त्या क्षणी नाटका आधीची तिसरी घंटा होऊन पडदा वर गेल्याचा क्षण आणि शेवटचा प्रवेश संपल्यावर पडदा पडल्याचा क्षण ह्या मधलं काहीच आठवत नव्हतं. तो मधला काळ जणू काही trans मध्येच गेलो होतो.
‘नाटका मधला माझा अभिनय चांगला झाला’ ह्या तात्पुरत्या आनंदा पेक्षा ‘मी ही स्टेज वर थोडाफ़ार अभिनय करु शकतो’ हा जो आत्मविश्वास मिळाला त्याला माझ्या लेखी जास्त मोल आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त मोल आहे ते युवामधल्या जिवाभावाच्या मित्र-मैत्रीणींबरोबर घालवलेले ते सोनेरी क्षण आणि त्या स्म्रुतींना.