(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)
पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा बेंगलोरला आलो, तेव्हा सगळं काही नवीन होतं. अंगावरच्या कपड्यांपासून ते कागदावरच्या नोकरीपर्यंत! पहिल्या पंधरा दिवसांचा ऑफिसने दिलेला ५-स्टार पाहुणचार लुटल्यानंतर, जेव्हा रोजच्या धबडग्यात पडलो, तेव्हा कधीकधी वाटायचं, की घरापासून आठशे मैल आलो, ते काय यासाठी? "कन्नडा गोत्तीला" एवढे शिकण्यासाठी आणि ९-ते-५ टायपिंगसाठी एसी ऑफिसमध्ये जाण्यासाठी? काहीतरी नक्कीच मिसिंग होतं (म्हणजे त्या 'लक्ष्य' सिनेमातल्या मेरे पास 'वो' नहीं है -- हॉ! 'लक्ष्य' --- इतकं उच्च पातळीवरचं नाही) काहीतरी नक्की अपूर्ण होतं. इंजिनियरींगच्या चार वर्षांत अभ्यास आणि टाइमपास सारख्या प्रमाणात केल्यानंतरही काहीतरी खरं करून दाखवण्याची खाज काही कमी झालेली नव्हती. खरं तर तोपर्यंत काही केलेलंच नव्हतं! (आणि अजूनही फार काही दिवे ऑन केले आहेत असं नाही, असो).
आणि अशा 'मनोवस्थेत' मला युवाबद्द्ल ऐकू आलं.
लोक सैन्यात 'शिरतात', प्रेमात 'पडतात', स्वातंत्र्य चळवळीत 'झोकून देतात', नोकरीवर 'रूजू होतात', संकटांना 'सामोरं जातात'. मी युवात सामील झालो! ते सामील होणं, हे त्या सर्वार्थांनी होतं! त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे, युवाच्या इतिहासात माझं सामील होणं हा काही सुवर्णाक्षरांनी वगैरे लिहून ठेवण्यासारखा दिवस नक्कीच नव्हता. माझ्या वैयक्तिक इतिहासात मात्र तो आहे.
युवा हा 'संघ' आहे. असंख्य स्वभाव-प्रकृतींच्या वल्लींनी हा संघ समृध्द केला आहे, होतो आहे. युवाच्या सगळ्या उद्योग-उचापतींविषयीची माहिती येथे तुम्हाला वेळोवेळी वाचायला मिळेलच. तुम्हाला जे जे आवडते ते करण्याची तुम्हाला युवामध्ये मुभा आहे. तुम्हाला अभिनय करायचा असेल, तुम्हाला इ-मेल फॉरवर्ड करायचे असतील, अखंड वटवट करायची असेल, क्रिकेट खेळायचे असेल, ट्रेक करण्याची आवड असेल, फालतू विनोद स्पर्धेत ढाल मिळवायची असेल, गाणं म्हणायचं असेल, किंवा नुसतंच ऐकायचं असेल, भाषण ठोकायचं असेल, खारीचा का होईना समाजसेवेत काही वाटा उचलायचा असेल आणि आता, लिखाणाचं व्यसन ब्लॉग माध्यमातून वाढवायचं असेल, तर असं सगळं तुम्ही करू शकता. तुमच्या या सगळ्या इंटरेस्टना पूरक असे मित्र-मैत्रीणी तुम्हाला 'युवा'त मिळतील यात तीळमात्र शंका नाही.
"युवाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, ते मी कसे फेडू बरे" इत्यादी cliche मध्ये मी काही पडणार नाही; कारण मी असलं काही शब्दांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकणार नाही याची मला खात्री आहे. युवा हा एक अनुभव आहे, आणि तो फक्त अनुभवावा, उगाच त्याचं पृथक्करण (म्हणजे मराठीत analysis) करत बसून नये असे माझे ठाम मत आहे. परंतु तरीही, दुबळा का होईना, एक प्रयत्न म्हणून मी काही वर्षांपूर्वी एक कविता(?) लिहिली होती. ती सादर करतो आहे.
युवा उवाच
जोश तारुण्याचा | प्रतिभेची साथ |
नवनवी क्षितिजे | खुणावती ||
सोडुनिया वाट | सरळ धोपट |
स्वीकारुनि आव्हान | आलो बंगलोरी ||
परप्रांत परभाषा | निराळेच रंग |
भोजनाचे हाल | परी निर्धार अभंग ||
गर्दीत त्या साऱ्या | ओलावा शोधीत |
फिरलो शहरी | या उद्यानांच्या ||
एके दिवशी अवचित | संध्याकाळी रम्य |
झालो मी दाखल | युवा मध्ये ||
ओळख ना पाळख | बुजरा स्वभाव |
परी घेतले सामावून | युवांनी मला ||
माझाच विश्वास बसे | ना माझ्यावर |
नाटकात जेव्हा || मी लाविले 'दिवे' ||
मग मी नाही | पाहिले वळून |
लुटल्या आनंदा | थांग नाही ||
गायन वादन | नाटक भ्रमंती |
तोडीच्या विनोदा | नाही आणि गणती ||
रम्य या शहरी | लाभले स्थैर्य |
जगण्याची जाणलो | सार्थकता ||
युवाची संगत | कायम लाभावी |
तुमच्यातलाच एक | युवा उवाच ||
2 comments:
Mitra Faarach suder lihila aahes..Sampadakiya :) Yogya shabdat achook bhavana tipalya aahes..Itaka awadala ki parat Yuvat samil vhyayachi ichhaa aahe...Chennaila ek brach open karoon dya.....
अजित,
तु किती छान लिहितोस ते सगळ्याना माहित आहेच. आज युवा blog ची सुरुवात तु केलिस हे फारच छान.
- सागर
Post a Comment