(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)
१
इयत्ता ७वी ते १०वी ही चार शालेय वर्षे वसतीगृहातल्या जीवनाची चव चाखल्यावर माझ्या मनानं घेतलं की आता “घरी” राहायचं. पुण्यातील उच्चशिक्षणाचा प्रख्यात दर्जा, शाळेत जोडलेले जिवाभावाचे मित्र, चार वर्षे अंगवळणी पडलेलं ज्ञान प्रबोधिनीचं धमाल कॅलेंडर अशा ब-याच गोष्टींचा मोह डावलून अस्मादिकांनी बंगलोरात पाऊल ठेवले. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची आणि नवीन बघण्याची [आणि नवीन करुन बघण्याची :-)] मला खुमखुमी होतीच. काय तेच तेच एसपी नाहीतर फर्ग्युसन नाहीतर रुपाली नाहीतर ११वी सायन्स आणि इंजिनीयरिंग!बंगलोर शहर मला तसे अगदी नवीन नव्हते म्हणा. गेली चार वर्षे उन्हाळी आणी दिवाळी सुट्ट्यांमध्ये इथेच तर तळ ठोकून असायचो की मी. पण महाराष्ट्र मंडळात एखाद्या कार्यक्रमाला गेलोय असा काही प्रसंग त्या सुट्ट्यांमध्ये घडला असल्याचे आठवत नाही. तेव्हा आमच्याकडे चारचाकीच काय पण दुचाकीसुद्धा नव्हती म्हटलं. म्हणूनच असेल कदाचित. बीटीएसच्या (तेव्हा लाल रंगाच्या) बसमधून मॅजेस्टिकला जायचो ते जास्त करून मराठी पेपर किंवा मासिके आणण्यासाठी.
कायमचा राहायला आल्यानंतर मात्र सुरुवातीला जरा भ्रमनिरासच झाला. तसा तो होतोच. माणसाची नं गंमतच असते. आयदर (अरेच्चा! मराठीत याला ‘एकतर’ म्हणतात – कित्ती सारखा शब्द आहे नाही?) तो भूतकाळात रमतो नाहीतर भविष्याची स्वप्नं रंगवतो. वर्तमानाची त्याला किंमत नसते. बंगलोरमधलं माझं पहिलं पूर्ण वर्ष शाळेतले ते रम्य दिवस आठवून हुरहुरण्यात गेलं. कॉलेज ठीक होतं, नवे मित्रदेखील चांगले भेटले होते; पण पुण्याची ती मजा काही न्यारीच असं मला जवळजवळ दीड वर्षं वाटतच राहिलं.
९६च्या गणेशोत्सवात मंडळात झालेली एक एकांकिका अजून आठवतेय. डोस्केदुखीचा फार्स असं नाव होतं. अगदी नेटकं सादरीकरण. माझ्याच वयोगटातल्या मुलामुलींनी केलं होतं. त्यावर्षी त्या संघाला पहिलं बक्षीस मिळालं.
संघ होता "युवा"!
(क्रमश:)