Wednesday, December 31, 2008

त्या वाळक्या काठीसोबत...

Posted by: प्रमोद (Pramod)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)

बाजारच्या रस्त्यावरून जाताना 
मी नेहमी माझ्या मित्राच्या दुकानात जायचो.
सारखा तराजूच्या पारड्यांवर मोजमाप करत असायचा.
सर्हाईतपणे विचारायचा--
"कुठं चालला आहेस?"
माझं उत्तर ठरलेलं-
"व्रुद्धाश्रमात"
पुन्हा ठरलेला प्रश्न:
"का वेळ घालवतोस वाया,
तिथं जाऊन?"
मी हसायचो.
शेजारच्या टपरीतून चहा मागवून
म्हणायचा,
"काय होतं तू तिथं जाऊन?"
"त्यांना बरं वाटतं इतकंच,
जाणवतं की त्यांच्या वेदना जाणणारं
आहे कु्णीतरी"
तो उशीला रेलत
आणखी एक घोट घेत म्हणायचा
"मग, त्यानं काय होतं?"
मग मी नुसता शांत व्हायचो.
मनातनं त्याच्या
असंवेदनशीलतेवर चिडायचो.
तो म्हणायचा,
"वेदना का जाणवतात, ठाऊक आहे?
संवेदनेमुळे--
वेदना संवेदनेची असते. अरे--
एकदम व्यावहारीक जगावं,
नफ्या-तोट्याचं गणित
सारखं मांडत रहावं!
तूच सांग, महत्त्वाचं गणित की संवेदना?
तुझं गणित पक्कं म्हणून तुला मिळाली
नोकरी, की संवेदना पक्की म्हणून?"
मी हसायचो.
"कुणीतरी द्यावी लागते संवेदना,
परत मिळण्यासाठी,
आणि
एकदा अंकुरली की
वाढत जाते आभाळभर
ज्ञानोबाच्या वेलीसारखी"
तो हसायचा नुसता.
पोरावर डाफरत,
"चाय मे पानी कम डालो"
सांगत पैसे काढून द्यायचा.
गल्ल्यातून.

***

परवा खूप दिवसांनी
गेलो त्याच्याकडे.
कधी नव्हे तो 
तराजूवर काही मोजत नव्हता.
काय करतो आहेस?
"स्पंदनं ऐकत बसलो आहे स्वतःची"
तो म्हणाला.
जवळ जाऊन बघितलं
तर भलं मोठं प्लॅस्टर पायाला
आणि शेजारी
एक मळकट काठी.
ओबड धोबड.
काय झालं रे?
काळजीनं म्हणालो तेव्हा,
"चालत्या लोकलमधून पडलो,
तरी बरं-
स्लो होती. नाही तर
राम नाम सत्य होतं"
मग?
"नंतर बराच वेळ पडलो होतो.
विव्हळत.
९:१०ची, ९:१५ची, ९:१८ ची
९:२०ची सगळ्या लोकल 
जात होत्या.
माणसांनी भरलेल्या.
पण
नाही आलं कुणी वळून
मदतीला."
कुणीच नाही??
"नाही. लेट मार्कचा लाल रंग
गहिरा असेल कदाचित,
रक्तापेक्षाही"
मग?
"तिथनंच आला चालत
एक लंगडा भिकारी
कष्टानं.
दगडांतून.
त्यानं दिली त्याची काठी मला.
ठेशन धा मिन्टावर हाय, बोलला.
खूप कष्टानं आलो चालत. तोसुद्धा--
खुरडत, सरपटत.
मग ऍम्ब्युलन्स आली. कुणीतरी नेलं
हॉस्पीटलमधे.
या धावपळीत--
ही काठी, त्या भिका-याची.
राहिली रे माझ्याकडे.
कसा चालत असेल?
कसा पोट भरत असेल तो?
येशील माझ्याबरोबर?
शोधू आपण त्याला.
येशील?"
चल.
उठला कष्टानं. 
तीच भिका-याची काठी घेत.
ओबडधोबड.
रीक्षानं जाताना,
ती काठी होती माझ्या हातात.
जाणवलं--
अचानक त्या ठार कोरड्याखट्ट काठीला
पानं फुटत आहेत--
वाढत्येय ती. बहरते आहे.
आभाळापर्यंत.
रीक्षातनं बाहेर 
शून्यात बघणा-या मित्राकडे 
नजर वळाली.
ज्ञानोबाच्या झाडाचं बी
रुजत होतं कुठेतरी त्याच्या काळजात.
त्या वाळक्या काठीसोबत.
ओबडधोबड.