Sunday, December 30, 2007

युवा: फार मजा आली बुवा!

Posted by: पद्मनाभ (Padmanabh)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)


मी असा एकटा... आलो होतो बंगलोर नगरात,
त्यावेळेस वाटला नव्हतं... एवढी मैत्री पडेल माझ्या पदरात.
अहो, धुंदीत आलो, धुंदीतच प्यालो,
एका एका घोटासरशी आयु्ष्याच्या नशेत अगदी नखशिखांत बुडालो...

नाही नाही म्हणता म्हणता,
प्रेमातच पडलो आणि भरपूर आनंद घेतला त्या नशेचा...
रंगभूमीवरच्या आवेशात...
वाटलं "युवा" होणे आहे भाग आपल्या नशिबाचा...

रंगदक्षिणी असो की गणपती उत्सव...
वाट बघत रहायची मंडळात पाऊल ठेवायची...
ते स्टेज... तो प्रकाशझोत अंगावर पडला...
की वाटायचं... आत्ता कुठे ओळख पटलीये आयुष्याची...

अहो सुरुवातीला आम्ही स्क्रीप्ट मागून स्क्रीप्ट गिळणार...
नंतर सगळे जण मिळून त्याचा रवंथ करणार...
कुणी प्रकाश, कुणी संगीत, बॅकस्टेज आणि दिग्दर्शन करणार...
आणि मग सगळ्या ऑनस्टेज गड्यांना... बाकीच्यांबरोबर लई घेनार...

काहीही झालं तरी आपली वेगळी छाप पाहिजे,
जग इकडचं तिकडे झालं तरी बेहत्तर, पण नाटकात एक पंच पाहिजे!
आमचं नाटक म्हणजे काय चेष्टा आहे की काय???
रात्रीचे दोन वाजले म्हणून काय झालं? क्लायमॅक्स चढत नाही म्हणजे काय???

बरं, नाटक बसतंच चांगलं, पण आमचं त्यावर समाधान नाही...
"व्हरायटी" दाखवली नाही तर आम्ही खरे युवा नाही!!!
नाचायचं तर नाचू, लाईट्स म्हणाल तर लाईट्स, संगीत म्हणालात तर तेही बजावू,
अहो बॅकस्टेजचा तर जोश असा... एका रात्रीत नवं जग उभं करू!!!

नशेची हौस इतकी, की न पीता महफ़िल जमवू,
अहो मदिरेला झिंग चढेल अशी गज़लेची बैठक घेऊ...
वादक निवेदक गायक असा एक जोरदार संच बसवू...
गाण्याची जुगलबंदी करत कट्यार 'डायरेक्ट' काळजात घुसवू!!!

आणि नंतर येणा-या 'वा!' चे काय सांगू पुराण,
पाच'वा' नंतर सहावा व्वाच लज्जत आणतो,
पुन्हा एकदा, अजून एकदा, तरी एकदा, असला जोरदार पुकार आमचा,
होय होय... तो शेवटचा व्वाच हॉल मध्ये जोष भरतो!!!

फार मजेशीर अनुभव दिलेत, या प्रवासाने आजपावेतोवर,
वळलोय आज एका नवीन आयुष्याच्या वळणावर,
एक मात्र निर्धार आजच मनाशी करतो,
गड्यांनो आज तुमच्यासमोर मन मोकळं करतो.

अहो वय वय म्हणजे काय? तर ते शरीराचे वय,
वाढो जसे खयालापासून तराण्यापर्यंत वाढत जाते लय,
दिसलो उद्या जरी वृद्ध, जमवत विविध अनुभवांचा संचय,
पण मनात नेहमीच पेटत ठेवीन एक युवा असल्याचं वलय...!