Thursday, September 27, 2007

आणि नाटक 'जिवंत' झाले! (My debut on the theater scene)

Posted by: कपिल (Kapil)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)


‘ नाटयं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकम् समाराधनम्’…बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रेक्षागृहात बसल्यावर समोरच लिहिलेलं हे वाक्य नेहमी दृष्टीस पडतं..एक प्रेक्षक म्हणून ह्याची प्रचिती अनेकदा आली होती; पण एक (हौशी) कलाकार म्हणून मला याची प्रचिती आली ती 'युवा' मध्ये आल्यावर. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, लेखन, अभिनय, भटकंती, क्रिकेट अशा भिन्न विभिन्न (आणि चित्र-विचित्र) आवडी असलेल्या व केवळ 'प्रेक्षकाची' भूमिका न निभावता वेळात वेळ काढून हे सर्व छंद ख-या अर्थाने जोपासणा-या हरहुन्नरी तरूणांच्या या 'संघात' आल्यावर..
इतर वेळेस सर्व युवा आपापल्या आवडीनुसार ठराविक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. पण युवाचं गणेशोत्सवातलं नाटक ही एक अशी गोष्ट होती ज्यात सर्व 'युवा' उत्साहाने सामील व्हायचे. on-stage, backstage, प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य...जमेल त्या भूमिकेत प्रत्येक जण मनापासून काम करायचा. वगवेगळ्या आवडी असलेल्या अनेक 'युवां' साठी नाटक हे एक समान आनंदनिधान असल्याचं अशा वेळेस जाणवायचं.
व्यावसायिक सोडाच पण खरं तर हौशी कलाकार म्हणवण्या इतपत ही माझा या क्षेत्रातला अनुभव नाही. तरीही एकाच नाटकाच्या अनुभवाच्या भांडवलावर (‘माझा पहिला नाट्यानुभव’ छापाचा) नाटकावरचा हा लेख लिहायला मी सुरुवात केली आहे..पाठिशी (किंवा गाठिशी) अनेक नाटकांचा अनुभव असल्याच्या ऐटीत. [पुणेकराला 'मत ठोकून द्यायला' इतका अनुभव पुरतो :) ]
शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात मी कधीच नाटकात काम केलं नव्हतं व त्या नंतरही कधी करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं; पण युवामध्ये आल्यापासून अशा अनेक ‘कधी करेन असं वाटलं नव्ह्तं’ या सदरातल्या गोष्टी मी केल्या (गैरसमज नसावेत, केवळ सांस्कृतिक गोष्टींबद्दल बोलतोय..अजून एक उदाहरण म्हणजे स्टेज वर (एकदाच...किंवा 'एकदाचं' ) केलेलं नृत्य…अजूनही समोरच्या प्रेक्षकांचे (खोखो) हसणारे चेहरे आठवतायत..त्यावर लिहायचं म्हटलं तर तो एक स्वतंत्र लेख होईल. :-)

असो (किंवा नसो!)

तर २००३ सालच्या गणेशोत्सवात मला य़ुवा च्या एका नाटकात एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. नाटकाचं नाव होतं ' जिवंत'. युवातल्याच आमच्या एका मित्रानी – देवेन्द्र देशपांडेनी हे नाटक लिहिलं होतं.
महाभारतातील 'अश्वत्थामा' हे पात्र केन्द्रस्थानी ठेवून ही कथा लिहिण्यात आली होती. अश्वत्थाम्यास त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांनुसार काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्याच्या प्रतिक्रिया कशा असू शकतील हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.

"जिवंत" मध्ये माझी भूमिका एका चोराची होती. हा चोर कुणी बदमाश/अट्टल चोर नव्हता. घरात पोराला पाजायला दूध नाही म्हणून गावातून गाय चोरणारा एक (पैशानी व स्वभावानी) अत्यंत गरीब असा चोर होता. चोरी करताना पकडला गेल्यामुळे गावच्या पाटलाकडून थेट कडेलोटाची शिक्षा सुनावण्यात आलेला हा मी चोर. कडेलोटासाठी एका कड्यावर मला आणलं जातं. मी पाटलाचे पाय धरून दयेची, माफिची याचना करत असतो. पण त्याचा त्याच्यावर काहीएक परिणाम होत नाही. जवळच उभ्या असलेल्या 'म्हातारबाबाचे' (अश्वत्थाम्याचे) पाय धरुन मी त्याला मला वाचविण्याची विनंती करतो. शिक्षेची अंमलबजावणी होणार इतक्यात अश्वत्थामा हस्तक्षेप करुन कडेलोट ही शिक्षा योग्य नसल्याचे सर्वाना पटवून देतो व ह्या अपराधाला दुसरी एक योग्य शिक्षा सुचवून माझी म्रुत्यूच्या दाढेतून सुटका करतो. असा तो (करूण) प्रसंग होता.

रंगभूमीवरचा आयुष्यातला माझा पहिला प्रवेश हा असा चोरपावलांनी झाला.

दोन - तीन अनुभवी कलाकार सोडल्यास उरलेले सहा लोक अभिनयाची अगदीच 'तोंड'ओळखही नसलेले होते. अशा लोकांना घेऊन नाटक बसविण्याचे आव्हान देवेन्द्र व सुजयसमोर होतं. नाटकाचा विषय, त्याची संहिता, माझी भूमिका, संवाद, अभिनय या सर्व गोष्टींआधी एक सर्वात महत्वाची गोष्ट शिकणं गरजेचं होतं. विशेषत: नाटकात प्रथमच काम करत असल्याच्या पार्श्वभूमीवर. ती म्हणजे निर्लज्जपणा ( ''निर्भीडपणा' लिहिणार होतो पण 'निर्लज्जपणा' हाच शब्द जास्त योग्य वाटतो :-)). English मध्ये ज्याला conscious होणं म्हणतात ते अजिबात न होणं. मी जे करतोय ते मला जमतय का किंवा शोभतय का ? लोक काय म्हणत असतील ? असले विचार मनात येऊ लागले की ती भूमिका फसलीच म्हणून समजावं. या गोष्टीमुळे बरेचदा भूमिकेतला सहजपणा जायचा व 'अभिनया' ची जागा 'नाटकीपणा' घ्यायचा. प्रत्येकाच्या स्वभावानुसार या गोष्टींवर कमी जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागली.

तालमीची सुरुवात संहितावाचना पासून झाली. पक्कं पाठांतर व योग्य, स्पष्ट शब्दोच्चारांवर आधी मेहनत घेऊन मगच stage वर जावं असं ठरलं व भूमिका छोटी असल्यामुळे ते सहज शक्यही होतं. सुरुवातीला स्टेज वगैरे सगळं विसरुन केवळ बसल्या जागेवरच आपले संवाद वाचायचो. ते जास्तीत जास्त परिणामकारक कसे होतील हे बघायचो. थोडक्यात कायिक अभिनयाची मदत न घेता केवळ ‘वाच्’इक् अभिनयानी आपण तो प्रसंग कितपत उभा करू शकतो ह्याचा अंदाज घेतला. आवाजाची तीव्रता, पट्टी, आवाजातले चढ उतार अशा ब-याच गोष्टींचे प्रयोग करुन पाहिले. आपली भूमिका पूर्णपणे समजून घेतली. 'चोरा'चे पूर्ण व्यक्तिमत्त्व व कुठल्या प्रसंगात तो कसा बोलतोय/बोलू शकतो हे डोक्यात ठेऊन माझे संवाद पुन्हा पुन्हा वाचले. असं वाचता वाचता त्या flow मध्ये मला स्वतःलाच त्या संहितेतल्या माझ्या संवादात काही नवीन शब्द, वाक्यं सुचत गेली. यातले काही किरकोळ बदल तत्काळ स्विकारलेही गेले. ( हे नाट्यशास्त्राच्या नियमांना वगैरे कितपत धरून होतं हे ‘देव’ जाणे. कदाचित 'बालादपी सुभाषितम् ग्राह्यम्' हया द्रुष्टिकोनातून देवेन्द्रनी ते स्विकारले असतील).

ह्या नंतर प्रत्यक्ष स्टेज वर practice सुरू केली. आवाजाच्या तयारीचा एक भाग म्हणून रोज practice च्या आधी सगळे मिळून मन्द्र, मध्य व तार सप्तकात ॐकार लावायचो. यामुळे मन खूप शांत आणि एकाग्र व्हायचं. स्टेज वरच्या एन्ट्री पासुन एक्झिट पर्यन्त अनेक नवीन गोष्टी शिकायच्या होत्या. प्रेक्षाग्रुहाकडे बघून नाटकातले संवाद म्हणताना प्रत्यक्ष प्रेक्षकांकडे न बघता साधारणपणे शेवटच्या रांगेच्या थोडी वर नजर ठेवून म्हणणे, (स्वतःच्या व प्रेक्षकांच्या दृष्टीतून) stage वरच्या व्यक्तींमधल्या अंतराचा अंदाज घेऊन त्यानुसार सर्व हालचाली करणे, stage वर असताना कमीत कमी वेळा प्रेक्षकांकडे पाठ करणे, ऐन वेळी कुणी एखाद्या संवादात गडबड केली तर त्याला (आणि त्या प्रसंगाला) सांभाळून घेणे, exit घेताना विंगेत परतल्यावर लगेच भूमिकेतून बाहेर न येणे असे अनेक बारकावे शिकून ते आत्मसात करायचा प्रयत्न करत होतो.

माझ्या भूमीकेत संवाद फार नव्हते पण शारीरिक हालचाली खूप होत्या. कडेलोटाची शिक्षा झाल्यामुळे भीतीने शरीराला कंप सुटलेला, स्टेज वर प्रवेश झाल्यापासुनच पडत, धडपडत, मार खात, ओरडत दयेची याचना करणारा चोर मला दाखवायचा होता. हे सर्व प्रकार केल्यामुळे आणि विशेषतः शरीर सतत थरथरतं ठेवावं लागत असल्यामुळे ब-यापैकी दमायला व्हायचं. मला मारत कड्यावर आणलं जातय असं दाखवायचं होतं. माझी एन्ट्री जास्त natural वाटावी म्हणून मला विंगेतून स्टेज वर चक्कं ढकलून देण्यात यायचं. मी देखील running race मध्ये start घ्यावी तसा विंगेतुन start घेऊन पळत यायचो व स्टेज वर स्वतःला 'झोकून द्यायचो'.
अजित, अरविंदनी हणम्या व सुभान्या या पाटलाच्या अंगरक्षकांच्या (किंवा गुंडांच्या -:)) भूमिकेत आपापले हात (आणि पायही) माझ्यासारख्या गरीब चोरावर चांगलेच साफ करून घेतले. (एकदा भूमिकेत शिरले की अभिनय व वास्तव यातला फरक ते बहुधा विसरत असावेत. माझी अवस्था इसापनीतीतल्या त्या सशांसारखी व्हायची ' तुमचा (नाटकाचा) खेळ होतो पण माझा जीव जातो').

काही दिवसांनी पुरेशा तालमीं नंतर stage वरील कलाकारांचे सर्व प्रसंग ब-यापैकी बसले. नंतर music सह practice करु लागलो..युवा मधलं 'संगीत युगुल' देवेन्द्र व अश्विनी यांनी प्रत्येक प्रसंगाला अत्यंत समर्पक व परिणामकारक पार्श्वसंगीत दिलं होतं. काही ध्वनीफिती त्यांनी स्वत: मंडळात ध्वनीमुद्रित केल्या होत्या.
जसे जसे एक एक प्रसंग बसत गेले तशी तशी अनघा व अदिती ह्यांची लाईट्सची टीम ही ‘उजेड पाडू’ लागली.

‘आपली भूमिका हास्यास्पद होऊ नये’ इतकी माफक 'महत्त्वाकांक्षा' घेऊन उजाडलेला तालमीचा पहिला दिवस आणि ‘आपल्या नाटकाला बक्षिस मिळणारच’ हा आत्मविश्वास देऊन जाणारा रंगीत तालमीचा शेवटचा दिवस या 'दोन' दिवसां मध्ये दिग्दर्शका प्रमाणेच सर्व on stage व back stage कलाकार, music team, lights team, team ह्या सर्वांनी घेतलेले अपार कष्ट होते.

नाटक झाल्यावर अनेक लोकानी मला नाटक व माझी भूमिका चांगली झाल्याचं सांगितलं. मला तरी त्या क्षणी नाटका आधीची तिसरी घंटा होऊन पडदा वर गेल्याचा क्षण आणि शेवटचा प्रवेश संपल्यावर पडदा पडल्याचा क्षण ह्या मधलं काहीच आठवत नव्हतं. तो मधला काळ जणू काही trans मध्येच गेलो होतो.

‘नाटका मधला माझा अभिनय चांगला झाला’ ह्या तात्पुरत्या आनंदा पेक्षा ‘मी ही स्टेज वर थोडाफ़ार अभिनय करु शकतो’ हा जो आत्मविश्वास मिळाला त्याला माझ्या लेखी जास्त मोल आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त मोल आहे ते युवामधल्या जिवाभावाच्या मित्र-मैत्रीणींबरोबर घालवलेले ते सोनेरी क्षण आणि त्या स्म्रुतींना.

Tuesday, September 25, 2007

युवा आणि मी (Yuva and I)

Posted by: शशि (Shashi)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)


माझ्या माहितीप्रमाणे युवाने बंगलोर महाराष्ट्र मंडळाच्या विश्वात “युवा” हे अभिधान मिरवत टाकलेलं पहिलं पाउल होतं गणेशोत्सवात सादर केलेली नाटिका “दरवेशी” (१९९५). सुरुवात अशी नाटकानेच झालेली असली तरी तेव्हा युवा म्हणजे नाटक असं समीकरण रुढ झालेलं नव्हतं. तसा विचारच नव्हता. समवयस्क मुलामुलींशी ओळख व्हावी, एकत्र जमावं, (मराठीत) गप्पा झोडाव्या, कधी ट्रिप काढावी, गणपतीत गंमत म्हणून नाटक बसवावं, मंडळाच्या हॉलची सजावट करावी, महाप्रसादाच्या जेवणात पंगती वाढाव्या, वर्षातून एकदा युवा डे (हल्लीच्या “जल्लोष”च्या धर्तीवर) साजरा करावा, कोजागिरी/ ३१ डिसेंबरच्या रात्री कोणाच्यातरी घरी (बहुतेकदा हर्षा-राजीच्या किंवा कीर्ती-प्रीतीच्या!) गच्चीवर गिल्ला करावा, एकमेकांना भरपूर चिडवावं, खावं-प्यावं, कल्ला करावा अशा काही माफक अपेक्षा होत्या आणि त्या नेमाने पूर्ण होत होत्या. युवात सामील व्हायचे निकष होते फक्त तीन – (१) तुमचे वय १६ ते २४ असले पाहिजे, (२) तुम्ही अविवाहित असला पाहिजेत, आणि (३) तुम्हाला मराठीचे थोडेतरी ज्ञान असणे आवश्यक.

आता मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं युवातले ते पहिले दिवस ब-याच अंशी कॉलेजजीवनासारखे तुफान होते. तोच उत्साह, तीच तरुणाई, तेच शिकणे, तशीच गंमत, तसाच टाईमपास, तसेच झोकून देणे आणि हुंदडणे! युवा माझे दुसरे कॉलेजच होते म्हणा ना. किंबहुना ख-या कॉलेजहून जास्त जिव्हाळ्याचे.

दिवस असे मजेत जात होते. ९७च्या गणेशोत्सवात युवाने एक नवीन प्रकार केला. “युवा उवाच” नावाचे एक मासिक सुरु केले. त्यातली पहिली कविता होती अशी –

राजमान्य राजेश्री, पत्र लिहिण्यास कारण की
आम्ही दिव्य पोरं पोरी, आमचं युवा लई भारी
करीत असतो नाटकं फार, अभ्यास-कामाची मारामार
नमुने एकेक फारच भारी, लाज नाही घरीदारी
दिसायला चेहरा फारच भोळा, प्रत्येकाच्या अंगी नाना कळा
अशा आमच्या युवाचे, कार्यक्रम मोठ्या मोलाचे
तरी तुम्ही यावे, युवात सामील व्हावे
युवामध्ये स्वागत तुमचे, धन्य आहोत आम्ही आमचे

कुठल्या कवीची ही प्रतिभा होती आता कळायला मार्ग नाही. राहुल काशीकर, प्रफुल्ल इंगळे, सचिन देसाई हे त्रिकूट तेव्हा फॉर्मात होतं. त्यांच्यापैकीच जो कोणीतरी असेल तो असेल, पण त्याने मला प्रेरणा द्यायचं काम केलं होतं.

दहा वर्षांपूर्वी जगात मोकळा वेळ ही मौल्यवान चीज मुबलक मिळायची. म्हणजे निदान ती आत्तासारखी खोल खाणीतून खणून काढावी लागत नसे. खिशात दमडा नसतानाही साहित्य-संगीत-कलांसारख्या सोन्याहून पिवळ्या गोष्टींसाठी वेळ खर्च करणे मात्र तेव्हा परवडत होते. त्यातून कमावलेल्या आनंदाची खरी किंमत आत्ता लक्षात येऊ लागलीय.

तर “युवा उवाच” मासिक चालवायची जबाबदारी मोठ्या उत्साहाने मी आपल्या शिरावर घेतली. मात्र मासिकाला नियमितपणे पाजता येईल इतक्या प्रमाणावर युवातल्या कोणाचीच प्रतिभा वाहत नसल्याचे लक्षात आल्यावर मासिकाचे लवकरच अनियतकालिक करण्यात आले. सुरुवातीला एक-दोन अंक भूपेश देशमुख आणि केदार देवधर माझ्या मदतीला होते. कधीतरी नयनच्या घरी मी तिच्या कंप्यूटरवर तिच्याचकडून मराठी टाईप करून घेतल्याचे आठवतेय.

युवा उवाचला खरा बहर आला तो २००० मध्ये अमोल थेरे आणि अभय घैसास मला येऊन मिळाले तेव्हा. त्या एका वर्षी आम्ही विक्रमी दोन अंक काढले होते. एक जानेवारीत आणि दुसरा गणेशोत्सवात. दोन्ही अंक १२ पानी म्हणजे आमच्या लेखी चांगलेच भरगच्च होते. आणि मजकूर तरी काय ग्रेट! य़ुवानेच केलेल्या नाटकाचे विडंबन, सहल वर्णने, कॉमिक स्ट्रिप्स, कविता, विनोद, युवाच्या तोपर्यंतच्या नाट्यप्रवासाचे सिंहावलोकन, पुलंच्या निधनावर माझा श्रद्धांजलीवजा अग्रलेख, राजूच्या अफलातून डिजिटल कौशल्याची पहिली चुणूक दाखवणारा माझा आणि अमोलचा लारा दत्ताबरोबरचा फोटो, मंडळातल्या बुजुर्ग उदासकाकांचा “आम्हीही तरुण होतो” हा ते ‘युवा’ असतानाच्या दिवसांवरचा लेख, मयुर जैनचा “अमेरिका अमेरिका” लेख, अभयने लिहीलेलं महादजी शिंद्यांचं व्यक्तिचित्र, सुजयची युवावरची मराठीतली कविता, आता इंटरनेटच्या माध्यमातून अक्षरश: जगभर पोचलेला आणि प्रचंड लोकप्रिय झालेला अमित सुलाखेचा “गाय” हा बालीश निबंध, “लग्न हो/ नाही? कधी? कसे?” ह्या विषयावर युवात घेतलेला सर्व्हे, राजूने युवाच्या तत्कालीन मेंबरांची काढलेली व्यंगचित्रे…किती सांगू आणि किती नको…यादी इतक्यात संपणार नाही! आता अभिमान वाटावा असे ते युवाचे वैविध्य, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा आणि डोकेबाज सृजनशीलता! “युवा उवाच”चे ते सुवर्णयुग होते.

मंडळाच्या रंगमंचावर धो धो यश मिळवायची सवयही तेव्हाच लागायला सुरुवात झाली होती. ९८ साली फेब्रुवारीत युवाने प्रथमच तिकीट लावून मंडळात “प्रेमाच्या गावा जावे”चे दोन हाउसफुल्ल प्रयोग केले आणि त्याच वर्षी गणेशोत्सवात “एक झंकार जपताना”ने बक्षिस समारंभात पहिल्यांदा झाडू मारला. ९९च्या गणेशोत्सवात “झोपी गेलेला…”ला सुद्धा चांगले यश मिळाले होते. २००० मध्ये “सदु आणि दादु”ने तर कळसच केला. पुलंच्या त्या नाटकात डबल रोल करताना आणि अभिनयाचे पहिले बक्षिस पटकावताना मला जे समाधान मिळालेय तसे पुन्हा अजून मिळायचेय. त्या एकांकिकेला आणि त्या युवा टीमला माझ्या मनात एक खास जागा आहे याचं कारण प्रत्यक्ष दिलीप प्रभावळकर (जे त्या दिवशी प्रेक्षकांत बसले होते) नाटिकेनंतर ग्रीन रूममध्ये येऊन पाठीवर कौतुकाची थाप मारून गेले. आणखी काय मोठे बक्षिस पाहिजे? माझ्यासाठी आयुष्यातल्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणांपैकी तो एक आहे एवढे नक्की.

ही सर्व घोडदौड चालू असताना युवात बेरीज वजाबाक्या चालू होत्याच. काही जण बंगलोर सोडून जात होते. त्यांना निरोप देताना छाती जडावत होती. काही नवीन लोक येत होते. त्यांचं स्वागत करताना, त्यांचा हरहुन्नरीपणा पाहताना नव्या हुरुपाने छाती पुन्हा फुगत होती.

आमच्यातले काहीजणांनी आता चोविशी ओलांडली होती, काही चतुर्भुज होऊ घातले होते. युवाच्या सहाव्या वाढदिवसाच्या आतच युवाचे पहिले दोन नियम धाब्यावर बसवण्याची वेळ आली. पण माझ्या मते अशा प्रकारे नियम शिथील करायला लागणे हेच युवाच्या यशाचे सर्वोत्तम द्योतक होते.

(क्रमश:)

Friday, September 21, 2007

Last Year's 'Vidhilikhit'

Posted by: Mayuresh Nirhali

GaNeshotsav is already set and all yuva members are preparing for their play on Sep 22nd, 2007. The marathi one act play competition held by Maharashtra mandal has been a great platform for all the marathi theatre-lovers in Bangalore. I have been in bangalore for 6 years now and have not missed a single chance to participate. I am committed even this year.

Now only few days to go for the BIG day and with the excitement and tension building towards the peak, I remember the gala we had last year (Ganeshotsav 2006) and thought would share the same with you.

Like every year, it takes a while to get people to come together as everyone would crib about the amount of work they already have. The reason or rather, the trigger for all of us every year is different. Last year it was a fantastic Sci-Fi concept from Sujay n pramod. Time Travel.

In the first theme discussion meeting that I attended pramod had written a short story from the concept that was on their mind. Pramod read the script and each one in the meeting reacted in a completely different way. Most of us just lost it somewhere in the middle. Some of us thought it does not make sense at all, some of us had clarifications. The basic plot was explained atleast 10 times between 15 of us. Lot of questions were asked, and interestingly people had different answers to all of them. At one point, it was a complete chaos, then the guyz just decided to stop, but their wives were shouting supporting their hubby's point. That was hilarious. The discussion went on for about 4 hours that night, and we came up with a little bit detailed sequence of scenes/events. At the end of the meeting, everyone was so much thrilled and involved that we all knew that this meeting was the trigger.

By the time actual practices started, we had only 2 weeks left for our slot in the competition. We knew making a Sci-fi requires a lot of technicalities and perfect execution of those. The main actors would need to do lot of work to ensure that the sci-fi concept reach the audience in its right intention. On top of everything, the script was still evolving. Every day, someone would come up with a good point and pramod will sit n incorporate the changes. Almost everyday, we (actors) would have to start mugging new lines. I just cant imagine the pressure of all this on the director, sujay.

But Everyday, we would make some good progress either on the script, music pieces, sets or actors being able to get the feel for the play. The story required to disappear characters from the stage and a time machine that would have some flashy lights n music when on the stage. This was new, everyone contributed with creative ideas and to everyone's surprise, things were working.

The initial concept was just about, 2 people coming back from 2 different and mutually exclusive futures. There was no conclusive end to this story and initially we decided to just leave it open. But towards the last few days of the practice, we decided to give a completely different twist to the story. With every such change, we were gaining more confidence. All of us have completely different day-to-day jobs and so have other (and I think better) things to do, so no one was able to do any homework during this crucial phase. Practices would start anytime between 9 - 12 pm and would go on for 2-3 hours minimum. The name for the play was not decided until we had to record the announcement piece just 4 days before the show. It was named as "Vidhi-Likhit". The night before the show, the dress rehearsal was good and the stagecraft people worked on the craftings the entire night. We were all set for the Show!

On Sept 2nd, 2006, Vidhi-likhit really rocked!! sleek! (agadi CHABUK!!)... everything that was planned was executed to the perfection. All technical gags, music/lights was on time. The audience was completely stunned. The theme and the entire package was completely new to the audience. We did not expect everyone to understand the play anyway! How many people understood The Matrix, the first time they watched it? :) We enjoyed every second of that performance and even the late night practice sessions.

The competition had 4 other plays and 2 of them were really comparable. On 6th Sep, the results were announced. We bagged half of the prizes.

2nd Best Drama - Yuva
Best Direction - Sujay
Best Actor - Nikhil
Best Sets- Meenakshi, Anagha, Namita
Best Lights - Kaustubh, Sagar
Best Music - Preeti, Kedar
Outstanding performance in the competition - Mayuresh.

Famous actor, Dr. Mohan Agashe, was invited as the chief guest for this festival and his event was scheduled the next day after our play. We invited him to come n see our performance and he graciously agreed. The next day we met him, He was really impressed. He looked at me n said "your acting was good", I will remember that.

I have done many plays till date, but only few in which I was involved right from the point when the script was being written, one was my first ever play, LIMIT, which is in the history of the most famous competition in pune, Purushottam Karandak and this is another. All my plays are really special to me and am really glad that there is one more completely different experience to add to the list.

Another special day is just round the corner... and there is plenty of stuff to do still!

Monday, September 17, 2007

नकळत घडले सारे (...And it so happened)

Posted by: निखिल (Nikhil)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)

(खरंतर हां blog लिहायला मी जरा उशीरच केला आहे. अजित आणि शशिचे blog वाचून मला खुमखुमी होतच होती म्हणा; परंतु आता "Better late than never" या न्यायाने लिहितो आहे. असो. )



दिवस होता १५ ऑगष्ट २००३. मला कुठून तरी कळलं की मंडळात युवा नवाचा group आहे, आणि ते या वर्षीच्या नाटकासाठी एक मुलगा शोधत अहेत. मी जायचा बेत नक्की केला. मंडळात जाताना डोक्यात खूप काही विचार होते. हा "मराठी संघ" आपल्याला accept करेल ना? मला sideline तर करणार नाहीत ना? नाटका मधे काम करायला जमेल ना ? एक ना दोन!

मी मंडळात गेलो, नाटकाची practice चालू होती। Hi-Hello-नमस्कार-चमत्कार झाले आणि मी practice बघत बसलो. जेमतेम ५ मिनिटं झाली असतील आणि तेवढयांत सुजय आला आणि म्हणाला, " आधी नाटकत काम केलं आहेस का ?" मी म्हणालो, "हो, शाळेत केलं होतं , पण त्यानंतर नाही " पुढचं काही ऐकून न घेता त्यानं ऑर्डर सोडली, "OK! Let's get on the stage---!"

त्यानंतर मी २ मिनिटं मधे stage वर होतो. Stage वरुन मला मोठ्या आवाजात ओळख करून द्यायला संगितली. मी एकदम जोषात येउन "मी निखिल कोरान्ने" असं चालू केलं. माझं वाक्य तोडत आणि माझ्या आवाजावर कडी करत मागून कोणीतरी 'कुजबुजला' "अरे आवाज!!!"
हा मागचा माणूस कौस्तुभ होता. मला वाटलं कॉलेजनंतर बहुतेक आज पहिल्यांदाच परत रॅगिंग होतंय की काय... मग अजून थोडा आवाज चढवत मी माझी ओळख करून दिली. माझ्या हातात स्क्रिप्ट देण्यात आली आणि मी डायलॉग घ्यायला सुरुवात केली. ब-याच दिवसांनी मराठी वाचत असल्यामुळे जरा अडखळतच होतो, आवाज़ पडत होता , वाचताना lines miss होत होत्या , काहीतरी वेगळेच अर्थ लागत होते मी वाचलेल्या lines che, काही विचारायला नको. थोडक्यात काय, तर मला थोडा स्टेज fear आला होता (याला कुठला फोबिया म्हणतात बरे?) मला वाटलं की आता कही खरं नाही; पण Sujay comments आणि त्याबरोबर धीरही देत होता. देवेन्द्र, कौस्तुभ माझ्या मदतीला होतेच. लवकरच माझी स्टेजवरची भीती जरा कमी झाली. मला आठवतंय, मी स्टेजवर वीस मिनिटं होतो अणि खाली आल्यावर पूर्ण घामेघूम झालो होतो. shoes घालायच्या तयारीतच होतो आणि माझी खात्री पटत चालली होती की मी स्टेज वर 20 minutes मधे जे काही केलं आहे ते बघून मला कोणीही नाटकत घेतला नसता. मी निघायची तयारी केली, सगळ्यांना bye म्हटलं. तेवढ्यात सुजय म्हणाला, "उदया शनिवार आहे, तेव्हा आपण लवकर practice सुरु करणार आहोत. so तू लवकर ये!" मी म्हटलं "काऽऽऽय "? "yes.. ही घे script अणि उदया भेटूच! bye!!"

तो एक सुखद धक्काच होता माझ्यासाठी, आणि त्या क्षणी, तेव्हा नकळत मी YUVA चा झालो होतो. घरी गेल्यावार मी script वाचून काढली अणि दुस-या दिवसाची वाट बघत बसलो!

(क्रमशः)

Monday, September 3, 2007

युवा आणि मी (Yuva and I)

Posted by: शशि (Shashi)
(Posted in Devanagiri script, please comment if you have font display issues we can guide you)


आपला core competence आयुष्यात लवकर उमजणे ह्यासारखे दुसरे भाग्य नाही. माझ्या व्यावसायिक जीवनात मला अजून तो तसा उमजला आहे की नाही हा माझा अंतर्गत वादाचा विषय आहे. पण कलाजीवनात मात्र मला काय करायला आवडेल ते मला नशीबाने शाळकरी जीवनातच जाणवले. शाळेत असताना आम्हाला अभिव्यक्ती विकासाचा वर्ग दर आठवड्याला असायचा. अभिनयाचे काय थोडेफार धडे मी गिरवले असतील ते तिथेच. त्याआधी अगदी लहानपणी मी कोकणातल्या आमच्या गावी रत्नेश्वराच्या उत्सवात संत तुकारामांच्या मुलाचं छोटंसं काम केलं होतं तेवढंच. नाटकं पाहिली होती, आवडायचीसुद्धा; पण आपण स्वत: स्टेजवर कधी उभे राहू असं वाटलंच नव्हतं. माझ्या शाळेनं मला तशी संधी दिली आणि त्याबद्दल मी तिचा आजन्म ऋणी राहेन.

ब-याचदा माणसाला आपली आवड/ आपले बलस्थान अचानक सापडते. एक नवी दिशा, नवे जग ध्यानीमनी नसताना एकदम उघडते आणि आपण एका नव्याच यात्रेला निघतो. तसंच ते झालं. माझ्यासारखा लाजरा बुजरा मुलगा आंतरशालेय प्रसंगनाट्य स्पर्धेसाठी शाळेच्या चमूत निवडला गेला आणि चक्क अभिनयाचं दुसरं पारितोषिक मिळवून आला. आपल्या अंगी काहीतरी कसब आहे आणि लोकांनी ते वाखाणलं आहे हा शोध किती भन्नाट असतो! गरीबाला स्वत:च्या घरात पुरलेला खजिना मिळावा तसा.


माझी ती अभिनय-आनंदयात्रा पुण्यात बरी चालली होती. तिच्यात आता खंड पडणार हे गृहित धरुनच मी बंगलोर गाठलं होतं. सुदैवाने तसं झालं नाही.

सध्या मी जरी कट्टर युवा सभासद असलो तरी बंगलोरमधली पहिली एकांकिका मी केली, "गांधार", ती “YTC” (Youngsters Theatre Circle) ह्या शेखर ब्रह्मेप्रणित ग्रुपबरोबर. ते नाटक दुर्दैवानं साफ पडलं. कोणतंच बक्षीस नाही की हो! नशीब, माझं पुढचं नाटक (Involvement Fantasy) जरातरी यशस्वी झालं. ते होतं “आम्ही”चं. युवा अजून माझा प्रतिस्पर्धी संघच होता!

रंगमंचावर वैर असलं तरी एरवी युवातल्या काहीजणींबरोबर मात्र माझी मैत्री वाढत गेली. त्या मुली होत्या कीर्ती व प्रीती साठे आणि नयन कवठेकर. याला कारण माझी मुलींमधली लोकप्रियता हे नसून आमचे सर्वांचे (आपापले) आई-वडील होते. त्यांची ओळख, गप्पाटप्पा आणि सहकुटुंब भोजनाचे प्रसंग वाढले होते ना! त्यामुळे अशा प्रसंगी उपरिनिर्दिष्ट मुलींना मला सहन करणे भाग पडत असे.

पण ह्या मुली चांगल्या निघाल्या बिचा-या. मला युवात खेचण्याचे मोलाचे काम त्यांनीच तर केले. त्या काळी माझ्या पाठीमागे मला शिष्ट म्हणायचा अगोचरपणा त्या करीत असत असे जरी आत्ता उघडकीस आले असले तरी मी मोठ्या मनाने त्यांना माफ केले आहे. काही झालं तरी त्यांच्यातल्या मिस. नयनने पुढच्या तीन-चारच वर्षांत माझ्याशी लग्न करायला होकार देण्याचा जो अतुलनीय शहाणपणा दाखवला त्याने भारावून जाऊन मी ही माफी केली आहे. शेवटी “क्षमा वीरस्य भूषणम्” म्हणतात तेच खरे.

माझ्या आठवणीनुसार ३१ डिसेंबर ९६ च्या रात्री मी पहिल्यांदा युवाच्या पार्टीला हजेरी लावली. ती पार्टी मला नक्कीच भावली असणार कारण पुढे लवकरच युवाच्या कूर्ग सहलीतही मी सामील झालो होतो. माझ्यातला शिष्ट (धीटपणे सांगायचं, तर खरं म्हणजे लाजाळू!) शशि हळुहळू मागे पडत गेला. लाजायचं काही कारणच उरलं नव्हतं. माझ्या नकळत युवाने मला सहजी सामावून घेतलं होतं. पुण्याच्या रम्य आठवणी आता मला छळेनाश्या झाल्या होत्या.

(क्रमश:)